
परभणी, 18 मे (हिं.स.)घरकुल योजना ही सर्वसामान्यांच्या हक्काची योजना असून पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळणे आवश्यक आहे, असे मत पंचायत समिती सभापती आयोध्या खिस्ते यांनी व्यक्त केले.
जिंतूर पंचायत समिती सभागृहात विविध शासकीय योजना तसेच घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती आयोध्या तर उपसभापती सोनी दराडे उपस्थित होत्या. बैठकीत यशवंतराव आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, शेतकर्यांसाठी सिंचन विहीर योजना तसेच मनरेगा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना घरकुल योजनांचा लाभ योग्य पद्धतीने मिळावा आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी अधिकार्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनानुसार पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीदरम्यान मंजूर घरकुलांची संख्या, सुरू असलेली व अपूर्ण घरकुले, लाभार्थ्यांनी काम सुरू न करण्याची कारणे, पहिला, दुसरा व तिसरा हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांची स्थिती, घरकुल बांधकामाची गुणवत्ता तपासणी, भू-छायाचित्र नोंदणी, संकेतस्थळावरील नोंदी तसेच अपात्र व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
वेळेत काम पूर्ण न करणार्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच ग्रामपंचायत अधिकार्यांनी नियमित प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने दिलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकर्यांना सिंचन विहीर व मनरेगा योजनेचा लाभ तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही संबंधित अधिकार्यांना देण्यात आले.
या बैठकीला तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती सदस्य तसेच गटविकास अधिकारी सुभाष मानकर उपस्थित होते. पंचायत समितीत नव्याने पदाधिकार्यांची निवड झाल्यानंतर शासनाच्या योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis