
पुणे, 18 मे (हिं.स.) : देवी शक्तीचा संचार असल्याचे सांगत लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू ऋषिकेश वैद्य याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी फेटाळला आहे. प्रकरणाचे गांभीर्य, उपलब्ध तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय देण्यात आल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सरकारी वकील लीना पाठक तसेच फिर्यादी पक्षाचे वकील रोहन नहार यांनी विरोध केला.
या प्रकरणात आरोपीने धार्मिक गुरू म्हणून असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत पीडितेवर अत्याचार केल्याचा युक्तिवाद फिर्यादी पक्षाने न्यायालयात केला. तपास अद्याप सुरू असून दोषारोपपत्र दाखल झालेले नाही, अशा परिस्थितीत आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले.
या सर्व मुद्द्यांचा विचार करून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. ही घटना डिसेंबर 2023 ते 11 मे 2025 या कालावधीत घडल्याचे प्रकरणात नमूद करण्यात आले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु