
नवी दिल्ली, १८ मे (हिं.स.) हॉकी इंडियाने २६ ते ३० मे दरम्यान ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणाऱ्या दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ चार सामन्यांची मालिका खेळणार असून, हे सामने पर्थ हॉकी स्टेडियमवर २६, २७, २९ आणि ३० मे रोजी होणार आहेत.
१५ ते २१ जून दरम्यान ऑकलंड येथे होणाऱ्या एफआयएच महिला नेशन्स कप २०२५-२६ च्या तयारीसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अर्जेंटिनाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या दमदार कामगिरीनंतर भारतीय संघ या दौऱ्यावर निघणार आहे, जिथे त्यांनी चार सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकले. तेव्हापासून, संघ बंगळूरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात कसून सराव करत आहे.
२०२२ राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांमधील कांस्यपदक विजेती सलीमा टेटे हिची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघात सविता, सुशीला चानू पुखरामबम, लालरेम्सियामी आणि नवनीत कौर यांसारख्या अनुभवी खेळाडूंसोबतच सोनम, हिना बानो आणि लालथंतुआंगी यांसारख्या तरुण खेळाडूंचाही समावेश आहे. नवनीत कौर फॉरवर्ड लाईनमध्ये संघाच्या आक्रमणाचे नेतृत्व करेल. बलजीत कौर, दीपिका, अन्नू, इशिका, हिना बानो आणि ऋतुजा दादसो पिसाल यांचा संघात समावेश आहे. हिना बानोची वरिष्ठ संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे.
सविता आणि बिच्छू देवी खारीबाम संघाच्या गोलकीपिंगची जबाबदारी सांभाळतील. डिफेन्सिव्ह लाईनमध्ये निक्की प्रधान, इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथंतुआंगी आणि ज्योती यांच्यासोबत शिल्पी डबास यांची वरिष्ठ संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. लालथंतुआंगीचीही वरिष्ठ संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. मध्यफळीत कर्णधार सलीमा टेटे, तसेच नेहा, लालरेम्सियामी, साक्षी राणा, सुनेलिता टोप्पो, दीपिका सोरेंग आणि सोनम यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ:
गोलरक्षक : सविता, बिच्छू देवी खरीबम
डिफेंडर: निक्की प्रधान, इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथंथलुआंगी, ज्योती, शिल्पी दाबस
मिडफिल्डर: सलीमा टेटे, लालरेमसियामी, नेहा, साक्षी राणा, सुनीलिता टोप्पो, दीपिका सोरेंग, सोनम
फॉरवर्डः नवनीत कौर, बलजीत कौर, दीपिका, अन्नू, इशिका, हीना बानो, रुतुजा दादसो पिसाल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे