
सोलापूर, 18 मे (हिं.स.)पंतप्रधान माेदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी विशेष उपक्रम राबवला. सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी नेहमीच्या शासकीय वाहनाऐवजी ई-बाईकवरून महापालिकेत प्रवेश केला. पर्यावरणपूरक वाहनाचा वापर करत महापौर महापालिकेत दाखल झाल्याने कर्मचारी आणि नागरिकांमध्ये या उपक्रमाची चर्चा रंगली.
या मोहिमेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि सभागृहनेते नरेंद्र काळे यांनीही सहभाग घेतला. उपमहापौर ईव्ही बाईकवरून, तर सभागृहनेते सायकलवरून महापालिका परिसरात दाखल झाले. ‘नो व्हेईकल डे’ आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या उपक्रमानिमित्त सायकल आणि इलेक्ट्रिक वाहनांसोबत पदाधिकाऱ्यांचे फोटोसेशनही करण्यात आले. पण, हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित राहणार की नियमितपणे राबवला जाणार, असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड