
अमरावती, 18 मे (हिं.स.)।
अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये परिचारिकांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करण्यात आलेल्या या कामबंद आंदोलनामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास परिचारिका PDMC च्या आवारात एकत्र जमल्या आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. प्रशासनाला याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याने सुरुवातीला आंदोलनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रुग्णालयातील नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी परिचारिकांनी वेतन थकबाकी आणि पुनर्नियुक्तीच्या मागण्यांसंदर्भात अमरावती येथील कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन दिले होते. त्यानंतर कामगार आयुक्त कार्यालयाने PDMC प्रशासनाकडे सविस्तर अहवाल मागविला होता. मात्र त्या अहवालाची प्रतीक्षा न करता परिचारिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले आहे.दरम्यान, आंदोलनस्थळी उपस्थित परिचारिकांकडे आंदोलनाच्या कारणांबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या नेमक्या मागण्या आणि पुढील भूमिका अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत.या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन सतर्क झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी