
परभणी, 18 मे (हिं.स.)महानगरांतर्गत वसमत व जिंतूर हे दोन्ही रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून वाहतूकीच्या दृष्टीने अक्षरशः धोकादायक बनले आहेत. त्याची मूळ कारणेसुध्दा स्पष्ट आहेत. मूळात या दोन्ही महामार्गावरील एकेरी वाहतूक करणारे रस्ते अक्षरशः अरुंद आहेत. या एकेरी रस्त्यावरुन दोन चारचाकी वाहनेसुध्दा एकमेकांना ओव्हरटेक करु शकत नाहीत. या अरुंद रस्त्यावरुन जड वाहनांना ओव्हरटेकर करुन पुढे सरकने म्हणजे अक्षरशः मृत्यूला सामोरे जाण्यासारखेच आहे.
त्यातच या दोन्ही अरुंद असणार्या महामार्गावर दोन्ही बाजूंनी काही मालमत्ताधारकांनी बांधकामे करतेवेळी सर्व नियम, अटी व शर्ती नेहमीप्रमाणे खुंटीला टांगल्या, टोलेजंग संकुले, इमारती उभ्या केल्या. पार्कींग वगैरे गोष्टी धाब्यावर बसविल्या. त्यात पुन्हा व्यापार्यांनी बेसुमार अतिक्रमणे करीत अगदी रस्त्यापर्यंत आपले बस्तान बसविले. तर त्यापुढे फुटपाथासह भर रस्त्यावरसुध्दा छोट्या मोठ्या हॉटेलधारकांसह पान टपऱ्या, भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी मोक्याच्या व वर्दळीच्या भागातील जागा पटकावून ठाण मांडले. त्यामुळे अरुंद असणारा दुतर्फा एकेरी मार्ग अधिकच अरुंद झाला. अन् वाहनधारकांच्या दृष्टीने तो जीवघेणा ठरला.
या दोन्ही महामार्गावर लांबपर्यंत वसाहती स्थिरावल्या आहेत. त्याबरोबरच मोठ मोठी दुकाने, शोरुम, एजन्सीज व मोठ मोठे हॉटेल्स रस्त्यापर्यंत भिडले आहेत. त्यातच शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, खाजगी वित्तीय संस्था, पेट्रोलपंप, हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालय, मंदिरे वगैरे वर्दळीची ठिकाणे रस्त्यालगत आहेत. त्यामुळे दोन्ही महामार्ग पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत अक्षरशः वर्दळीचे बनले आहेत. शहराच्या चोहोबाजूंनी एकही बायपास रस्ता नाही. त्यामुळे बाहेरील जड वाहतूक मध्यवस्तीतूनच खूलेआमपणे सुरु आहे. त्याचा परिणाम अरुंद असणार्या या रस्त्यावर वाहतूकीचा प्रचंड असा ताण आला आहे. त्याचा परिणाम शहर वाहतूक पूर्णतः कोलमडली आहे. छोटे मोठे अपघात नित्याचेच बनले आहेत. या अपघातांमधून शेकडोंचे बळी गेले आहेत. हजारो जायबंदी झाले आहेत.
अपघातांच्या मालिकांना खंडच नाही. पण, महानगरपालिकेसह साखरझोपेतील शहर वाहतूक पोलिस यंत्रणेसह वरिष्ठ पोलिस अधिकारी व अन्य विभागांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. खासदार-आमदारांसह महापालिका पदाधिकारी व सदस्यांना वाहतूकीच्या कोंडीसह त्यासाठीच्या कायमस्वरुपी ठोस उपाययोजनेच्या प्रश्नांबाबत फारसे स्वारस्य नाही. तो प्रश्नच नाही, या अविर्भावात हे लोकप्रतिनिधी आजपर्यंत वावरत आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सर्वसामान्यांनी कधीच अपेक्षाही व्यक्त केल्या नाहीत. त्याचा परिणाम वसमत व जिंतूर हे दोन्ही महामार्ग अक्षरशः बेवारस बनले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis