
अमरावती, 18 मे (हिं.स.)
बच्चू कडू यांच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे अचलपूर परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा विषय आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अचलपूर येथे स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याच्या मागणीला अखेर शासन स्तरावर गती मिळाली असून परिवहन विभागाने यासंदर्भातील प्रशासकीय हालचाली सुरू केल्या आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना वाहन परवाना, वाहन नोंदणी, फिटनेस, परमिट तसेच इतर वाहनविषयक कामांसाठी तब्बल १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापत अमरावतीला जावे लागत होते. यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंडासोबतच मोठा मानसिक त्रासही सहन करावा लागत होता. जनतेच्या या अडचणी ओळखून बच्चू कडूंनी हा प्रश्न थेट शासन दरबारी लावून धरला.परिवहन मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात बच्चू कडूंनी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सविस्तर मांडल्या होत्या. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत परिवहन विभागाने आता अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यामुळे अचलपूर येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू होण्याच्या आशा अधिक बळावल्या आहेत.
विशेष म्हणजे, बच्चू कडूंनी यापूर्वीच “अमरावती शहर” आणि “अमरावती ग्रामीण” असे स्वतंत्र वाहन क्रमांक देण्याची मागणी शासनाकडे केली होती. नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणच्या धर्तीवर अमरावतीलाही स्वतंत्र ओळख मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनिक विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी वारंवार अधोरेखित केले आहे.अचलपूर हा भविष्यात स्वतंत्र जिल्हा म्हणून विकसित होऊ शकणारा सक्षम भाग असून येथे आवश्यक प्रशासकीय सुविधा, विस्तृत जागा आणि वाहन प्रशिक्षणासाठी ट्रॅक उभारणीची क्षमता उपलब्ध असल्याचेही बच्चू कडूंनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.अचलपूर येथे स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाल्यास अचलपूर, चांदूर बाजार आणि परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी सेवा अधिक वेगवान, सुलभ आणि लोकाभिमुख होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी