
अमरावती, 18 मे (हिं.स.) अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनदरम्यान चांदूर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून एमडी ड्रग्ज, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ₹१ लाख १८ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशान्वये १६ मेच्या रात्रीपासून १७ मेच्या पहाटेपर्यंत अमरावती ग्रामीण जिल्ह्यात विशेष कोंबिंग ऑपरेशन व गस्त मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांना गुप्त माहिती मिळाली की, चांदूर बाजार येथील राजा, साद आणि अनवेज हे अमरावतीहून एमडी घेऊन परत येणार आहेत. माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. राजपत्रित अधिकारी, पंच, फोटोग्राफर तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काट्यासह पथक तयार करून ग्राम खरवाडी फाटा, चांदूर बाजार-वलगाव रोड येथे सापळा रचण्यात आला. पहाटे दोन वाजताच्या सुमारास एका बजाज पल्सर मोटारसायकलवरून येणाऱ्या तिघांना अडवून पंचासमक्ष झडती घेण्यात आली. या कारवाईत अनवेज शहा शरीफ शहा (१८), फिदा हुसेन उर्फ राजा झाकीर हुसेन (२२) आणि साद अहमद मस्ताक अहमद (१८) या तिघांकडून ७.१९० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले. प्राथमिक एफएसएल तपासणीत हा पदार्थ मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींकडून अंदाजे ₹२८,८७० किंमतीचे एमडी, ₹७० हजारांची मोटारसायकल तसेच दोन मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी