
पुणे, 18 मे (हिं.स.) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026-27 शैक्षणिक वर्षापासून नववीतील विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा शिकणे अनिवार्य केले आहे. या नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना दोन भारतीय भाषा शिकणे बंधनकारक राहणार आहे.
नव्या नियमानुसार 1 जुलै 2026 पासून नववीच्या वर्गात हा बदल लागू होणार आहे. यापूर्वी CBSE ने सहावीपासून तिसरी भाषा अनिवार्य करण्याचा संकेत दिला होता, मात्र आता नव्या परिपत्रकाद्वारे नववीपासून अंमलबजावणी निश्चित करण्यात आली आहे.
या धोरणानुसार परदेशी भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी दोन भारतीय भाषा शिकणे आवश्यक असेल. तसेच परदेशी भाषा चौथी भाषा म्हणून शिकण्याची मुभा देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी तिसऱ्या भाषेचे मूल्यांकन शाळास्तरावर अंतर्गत पद्धतीने केले जाणार आहे. या मूल्यमापनाची नोंद प्रमाणपत्रात केली जाईल, मात्र त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसण्यापासून रोखले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच तिसऱ्या भाषेसाठी नमुना प्रश्नपत्रिका आणि अंतर्गत मूल्यमापनाचे निकष लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे CBSE कडून सांगण्यात आले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु