
पुणे, 18 मे (हिं.स.) : शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरविण्यात येणार आहेत. यासाठी शाळांतील सुस्थितीत असलेल्या अतिरिक्त वर्गखोल्या अंगणवाड्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केले आहे.
राज्यात सध्या 1 लाख 10 हजारांहून अधिक अंगणवाड्या कार्यरत असून, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या धोरणानुसार पूर्वप्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्याअंतर्गत 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘आधारशिला बालवाटिका 1, 2 आणि 3’ हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
बहुतांश अंगणवाड्या शाळांपासून स्वतंत्र ठिकाणी असल्याने त्यांना शाळांशी जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणाचा समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे.
नव्या निर्णयानुसार, ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्यांव्यतिरिक्त सुस्थितीत अतिरिक्त खोली उपलब्ध असेल, ती खोली 2026-27 पासून अंगणवाडीसाठी वापरण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु