पुणे शहरातील सात एन्ट्री पॉइंटवर दररोज वाहन तपासणी
पुणे, 18 मे (हिं.स.)। पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी शहराच्या प्रमुख प्रवेश वेशींवर विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मार्गांवर नाकाबंदी करून वाह
Pune Police


पुणे, 18 मे (हिं.स.)।

पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी शहराच्या प्रमुख प्रवेश वेशींवर विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मार्गांवर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.शहरात येणाऱ्या सात प्रमुख मार्गांवर ही मोहीम राबविण्यात येणार असून, त्यामध्ये सातारा रस्ता, बाणेर रस्ता, सोलापूर रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग, नगर रस्ता, सिंहगड रस्ता आणि सासवड रस्ता यांचा समावेश आहे.पोलिसांकडून दररोज रात्री ठरावीक वेळेत वाहन तपासणी केली जाणार आहे. या तपासणीदरम्यान संशयित वाहनांची पाहणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.या मोहिमेत वाहतूक शाखा, स्थानिक पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. दर आठवड्याला वेगवेगळ्या प्रवेश वेशींवर नाकाबंदी होणार असल्याने शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande