
नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.)आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी एका महत्त्वपूर्ण सामन्यात झाला. दिल्लीच्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने आठ गडी गमावून १९३ धावा केल्या. तथापि, मिचेल स्टार्कच्या (४ बळी) भेदक गोलंदाजीमुळे राजस्थानला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्ससाठी अभिषेक पोरेल (५१) आणि केएल राहुल (५६) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. कर्णधार अक्षर पटेलने अखेरीस महत्त्वपूर्ण नाबाद ३४ धावा करून शेवटच्या षटकात दिल्लीला विजय मिळवून दिला. या विजयासह, दिल्ली कॅपिटल्सने या हंगामातील आपला सहावा विजय नोंदवला, तर राजस्थान रॉयल्सला सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
दिल्लीच्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल नऊ चेंडूंमध्ये १२ धावांवर बाद झाला. पण वैभव सूर्यवंशीने २१ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४६ धावांची शानदार खेळी केली. वैभव आणि जैस्वाल यांच्यानंतर, ध्रुव जुरेलने ४० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांसह ५३ धावा केल्या. कर्णधार रियान परागने २६ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि पाच षटकारांसह ५१ धावांची वेगवान खेळी केली. पण तळाचे फलंदाज अपयशी ठरले, त्यामुळे राजस्थान रॉयल्सला २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १९३ धावांवर समाधान मानावे लागले. दिल्ली कॅपिटल्सकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने चार बळी घेतले, तर लुंगी एनगिडी आणि माधव तिवारी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
१९४ धावांचे लक्ष्य गाठताना, दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर अभिषेक पोरेलने वेगवान सुरुवात करून दिली. त्याने ३१ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा केल्या. दरम्यान, केएल राहुलने ४२ चेंडूंमध्ये एक चौकार आणि तीन षटकारांसह ५६ धावा ठोकल्या. त्यांच्या या खेळीमुळे दिल्लीने एके वेळी तीन गडी गमावून १३३ धावा केल्या. त्यानंतर दिल्लीला शेवटच्या २२ चेंडूंमध्ये ४१ धावांची गरज होती. दरम्यान, ट्रिस्टन स्टब्स सहा चेंडूंमध्ये केवळ चार धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार अक्षर पटेलने सूत्रे हाती घेतली आणि दोन चौकार व दोन षटकारांसह १८ चेंडूंमध्ये नाबाद ३४ धावा केल्या. आशुतोष शर्मानेही एक चौकार आणि दोन षटकारांसह पाच चेंडूंमध्ये नाबाद १८ धावा करत स्फोटक खेळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे