
जळगाव, 18 मे (हिं.स.) : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. 18 जून 2026 रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार असून जिल्ह्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे.
माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्येच उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. संख्याबळाच्या दृष्टीने महायुतीचे स्पष्ट वर्चस्व असले तरी भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या शिवसेनेत या जागेसाठी अंतर्गत स्पर्धा वाढली आहे.
या मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अस्तित्वात नसल्याने केवळ नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी हेच मतदार असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतीय जनता पक्षाकडून या जागेसाठी नंदकुमार अडवाणी, नंदकिशोर महाजन, अमोल शिंदे आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याने ही जागा मिळवण्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
महायुतीतील एकत्रित उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू असली तरी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरूच आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुतीसाठीही प्रतिष्ठेची बनली आहे.
नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांच्या एकूण संख्याबळात महायुतीचे वर्चस्व स्पष्ट आहे. मात्र विविध स्थानिक आघाड्या, अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
विशेषतः काही स्थानिक विकास आघाड्या, शहर विकास गट आणि अपक्ष नगरसेवकांशी मंत्री गुलाबराव पाटील यांचे चांगले संबंध असल्याने या निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका कोण निभावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच जळगाव जिल्ह्यातील ही विधान परिषदेची निवडणूक केवळ उमेदवारीपुरती मर्यादित न राहता महायुतीतील ताकद मोजणारी आणि स्थानिक राजकारणाचा नवा कल ठरवणारी ठरणार आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर