
दिव्यांग भवन उभारणार असल्याची आमदार अमोल जावळे यांची घोषणा
जळगाव, 19 मे (हिं.स.) : रावेर येथे दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था होळ यांच्या पुढाकाराने 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
श्री दत्तगुरु छाया मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार अमोल जावळे यांनी अध्यक्षीय भाषणात रावेर येथे लवकरच दिव्यांग भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी दर महिन्याला नियमित शिबिरे आयोजित केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात तहसीलदार दीपा जेधे यांनी दिव्यांग बांधवांसाठीच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच जनगणनेत योग्य माहिती देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक समरसतेचा संदेश देत हा विवाह सोहळा पार पडला.
या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी शासन आणि समाजाने एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, संगीत सादरीकरण आणि विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर