
रत्नागिरी, 19 मे (हिं.स.) । ठाण्यातील सोलारिस हॉस्पिटलतर्फे रत्नागिरीत आयोजित मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ ७७ रुग्णांनी घेतला.
रत्नागिरी नगर परिषद, अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिराचा फायदा केवळ रत्नागिरी शहरापुरता मर्यादित न राहता चिपळूण, संगमेश्वर, दापोली, मंडणगड आणि खेड यांसारख्या विविध भागांतील नागरिकांनी घेतला. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले. यावेळी नगरसेवक सौरभ मलुष्टे, स्मितल पावसकर, श्रद्धा हळदणकर, रुक्सार खान, मेधा कुलकर्णी, पूजा पवार, फौजिया मुजावर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षा स्वप्ना करे आणि शिर्के प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष मनोज पाटणकर उपस्थित होते.
शिबिरात हॉस्पिटलचे संचालक व न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे आणि न्यूरॉलॉजिस्ट डॉ. दीपक ऐवळे यांनी रुग्णांना मोफत मार्गदर्शन व उपचार सल्ला दिला. डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले की, न्यूरो-नेव्हिगेशन हे मेंदूसाठी 'जीपीएस'सारखे काम करते, ज्यामुळे कवटी न उघडता नाकावाटे अत्यंत अचूक आणि सुरक्षित शस्त्रक्रिया करता येते. तसेच मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या ६ तासांत हालचाल करू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी