परभणीत अल्पवयीन मुलीशी छेडछाड प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी
परभणी, 19 मे (हिं.स.) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन पीडित मुलीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.पी. त्रिभुवन यांनी आरोपी सोनुसिंग पुनमसिंग टाक (वय 28) यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.यासोबतच आर
परभणीत अल्पवयीन मुलीशी छेडछाड प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी


परभणी, 19 मे (हिं.स.) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन पीडित मुलीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.पी. त्रिभुवन यांनी आरोपी सोनुसिंग पुनमसिंग टाक (वय 28) यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.यासोबतच आरोपीला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.

ही घटना 6 सप्टेंबर 2019 रोजी समोर आली होती. पीडित अल्पवयीन मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मोटारसायकलवरून तिचा पाठलाग करत होता. शांतिनिकेतन कॉलनी, माऊली चौक, गुरुकृपा चौक आणि पेडगाव रोडमार्गे ट्युशनपर्यंत तो तिचा पाठलाग करत होता.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपीने “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत तिची छेडछाड केली. या प्रकरणानंतर दामिनी पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर भादंवि कलम 354(ड), 509 तसेच पोक्सो कायदा कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले आणि आरोपीविरुद्ध गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अभिलाषा पाचपोर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. तसेच मुख्य सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने खटला चालवण्यात आला.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande