
पुणे, 19 मे, (हिं.स.) - बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला पुन्हा एकदा मुहूर्त लागला नाही. यापूर्वी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे सभा तहकूब करावी लागली होती, तर आता २० मे रोजी होणारी सभा देखील विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलावी लागणार आहे. बारामतीतील विकासकामांवर वारंवार लागू होणाऱ्या आचारसंहितेचा विपरीत परिणाम होत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने याबाबत निवडणूक आयोगाकडे दाद मागावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच बारामतीत आचारसंहिता तात्काळ लागू झाली. त्यामुळे आता नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा घेणे प्रशासनासाठी अशक्य झाले आहे.प्रत्यक्षात अर्थसंकल्पीय सभा वगळता गेल्या सहा महिन्यांत नगरपरिषदेची एकही नियमित सर्वसाधारण सभा होऊ शकलेली नाही.
डिसेंबर २०२५ मध्ये नगरसेवक निवडून आल्यानंतर जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे कामकाजावर परिणाम झाला. त्यानंतर अर्थसंकल्पीय सभा झाली, मात्र लगेचच विधानसभेची आचारसंहिता लागू झाली. आता २० मे रोजी सभा आयोजित करण्यात आली असतानाच विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनावर पुन्हा सभा तहकूब करण्याची वेळ आली आहे.या सभेत तब्बल ७७ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय अपेक्षित होते. मात्र वारंवार लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे शहरातील विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु