वांद्र्यातील गरीब नवाज झोपडपट्टीवर रेल्वेची बुलडोझर कारवाई
मुंबई, 19 मे (हिं.स.)। मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील गरीब नवाज झोपडपट्टीवर रेल्वे प्रशासनाने मोठी तोडक कारवाई केली. रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्या बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या.
Bulldozers Move Bandra Garib Nawaz Slum


मुंबई, 19 मे (हिं.स.)। मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील गरीब नवाज झोपडपट्टीवर रेल्वे प्रशासनाने मोठी तोडक कारवाई केली. रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्या बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे या झोपड्या केवळ साध्या झोपड्या नसून काही ठिकाणी तीन मजली, चार मजली तसेच दुमजली बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात अक्षरशः मिनी इमारती उभ्या राहिल्या होत्या. ही सर्व बांधकामे बेकायदेशीर असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने अखेर कठोर कारवाई केली.

सकाळपासूनच गरीब नगर परिसरात पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने सहा बुलडोझरच्या मदतीने झोपड्या हटवण्याचे काम सुरू केले असून अजूनही ही मोहीम सुरू आहे. अनेक वेळा नोटिसा देऊनही रहिवासी जागा खाली करत नसल्याने अखेर प्रशासनाने बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नवीन रेल्वे मार्गांच्या विस्तारासाठी ही जागा मोकळी करणे अत्यावश्यक आहे. परिसर मोकळा झाल्यानंतर येथे नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी यापूर्वीच सांगितले होते की, उच्च न्यायालयाच्या कडक निर्देशांनुसार अतिक्रमण हटवणे आवश्यक असून रेल्वे वाहतुकीच्या वाढत्या गरजांसाठी हा विस्तार महत्त्वाचा आहे.कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक हजारांहून अधिक पोलीस आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात सज्ज ठेवण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील दोन पूलही बंद करण्यात आले होते.

दरम्यान, या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रहिवाशांनी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस देण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. सुमारे १४० घरे पाडली जाणार असून घरांच्या बदल्यात पर्यायी निवासाची मागणी स्थानिकांनी केली आहे. अनेक कुटुंबांनी कारवाईपूर्वीच आपली घरे रिकामी केली होती. रेल्वे प्रशासन पुढील दोन दिवस ही मोहीम राबवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande