पुणे विमानतळावरून तीन बांगलादेशी ताब्यात
पुणे, 19 मे (हिं.स.) : पुणे विमानतळावरून गुवाहाटी (आसाम) येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी विमानतळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. शाहीनूर बेगम शेख (वय ४२), शागुरिका बेगम युलिया शेख (व
Pune Air port


पुणे, 19 मे (हिं.स.) : पुणे विमानतळावरून गुवाहाटी (आसाम) येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी विमानतळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. शाहीनूर बेगम शेख (वय ४२), शागुरिका बेगम युलिया शेख (वय २८) आणि टोपू ऊर्फ मुराद अहमद शेख (वय १६ वर्षे ९ महिने) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन महिला आणि एक पुरुष असे तीन बांगलादेशी नागरिक पुणे विमानतळावरून गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत आहेत.

या माहितीच्या आधारे खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास पथकाला तातडीने विमानतळावर रवाना केले. विमानतळ पोलिस ठाण्याचे अधिकारी पालवे, सीआयएसएफचे अधिकारी संतोषकुमार अग्निहोत्री आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने विमानतळ परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत संबंधितांनी आपण बांगलादेशातील बिगाराट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच ते सोलापूरहून पुण्यात आले असून, पुण्याहून गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली.

पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी तिघांना विमान नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या दहा महिन्यांत परिमंडळ १ परिसरातून ९७ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले आणि एसीपी अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.---------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande