
मुंबई, 19 मे (हिं.स.)। मुंबईतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली असून लोकनेते दिवंगत एकनाथराव गायकवाड यांचे चिरंजीव, खासदार वर्षाताई गायकवाड यांचे बंधू आणि मुंबई काँग्रेसचे महासचिव तुषार एकनाथराव गायकवाड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे गायकवाड परिवारासह काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
तुषार गायकवाड हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीशी सक्रियपणे जोडलेले होते. जरी त्यांनी मोठ्या निवडणुका लढवल्या नव्हत्या, तरी स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले होते. काँग्रेस पक्षाशी त्यांचे नाते हे त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय परंपरेतून अधिक दृढ झाले होते. कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संपर्क, शांत स्वभाव आणि पक्षनिष्ठा यामुळे ते मुंबई काँग्रेसमध्ये महत्त्वाचे मानले जात होते.
गायकवाड परिवार हा महाराष्ट्राच्या काँग्रेस राजकारणातील एक प्रभावशाली आणि निष्ठावान परिवार म्हणून ओळखला जातो. तुषार गायकवाड यांचे वडील दिवंगत एकनाथराव गायकवाड हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराशी निष्ठा राखली होती. मुंबईतील दलितबहुल भागांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता. सन २०२१ मध्ये कोरोनामुळे त्यांचे निधन झाले होते. आता त्यांच्या पुत्राच्या निधनामुळे गायकवाड परिवारावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तुषार गायकवाड यांच्या पश्चात त्यांची बहीण आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्यासह संपूर्ण परिवार आहे. वर्षा गायकवाड या धारावी मतदारसंघाच्या माजी आमदार असून त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. सध्या त्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.
तुषार गायकवाड यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत विक्रोळी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत कन्नमवार नगर क्रमांक एक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार्थिव ठेवण्यात येईल. सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी त्यांच्या अकाली जाण्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक आणि राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि गायकवाड परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली सर्व स्तरांतून अर्पण केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule