लातूर - धानोरा पाटीजवळ दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू
लातूर, 19 मे, (हिं.स.) - धानोरा पाटीजवळ रस्त्याच्या कडेला पाणी भरत असताना भरधाव व निष्काळजीपणे आलेल्या एका दुचाकीने जोराची धडक दिल्याने ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरु
अपघात


लातूर, 19 मे, (हिं.स.) - धानोरा पाटीजवळ रस्त्याच्या कडेला पाणी भरत असताना भरधाव व निष्काळजीपणे आलेल्या एका दुचाकीने जोराची धडक दिल्याने ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मथुराबाई विश्वनाथ श्रीमंगले (वय ६०, रा. धानोरा खुर्द, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा संतोष विश्वनाथ श्रीमंगले (वय ३९) यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष श्रीमंगले हे अहमदपूर येथे नाभिक दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संतोष हे आपल्या दुकानात असताना, त्यांचे वडील विश्वनाथ श्रीमंगले यांनी फोन करून माहिती दिली की, मथुराबाई या धानोरा पाटी येथील अहमदपूर ते कुरुळा रोडच्या कडेला पाणी भरण्यासाठी थांबल्या होत्या.

त्याच वेळी कुरुळा बाजूकडून अहमदपूरकडे येणाऱ्या एका भरधाव मोटारसायकलने (क्रमांक MH 22 BD 2832) मथुराबाई यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ अहमदपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

अपघात घडवून आणणाऱ्या दुचाकी चालकाचे नाव विलास संभाजी हबगुंडे (रा. रिसनगाव, ता. लोहा, जि. नांदेड) असे असून, त्याच्या मागे राजू संभाजी थावरे (रा. शिंदगी, ता. अहमदपूर) हा बसला होता. हे दोघे शिंदगी येथील नातेवाईकांकडून अहमदपूरकडे जात असताना हा अपघात घडला.

फिर्यादी संतोष श्रीमंगले यांच्या जबाबानुसार अहमदपूर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक विलास संभाजी हबगुंडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २८१ आणि १०६(१) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद नामदेवराव श्रीमंगले यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande