परभणी - आगीत कडबा आणि शेतीचे साहित्य जळून खाक; शेतक-याचे लाखोंचे नुकसान
परभणी, 19 मे (हिं.स.) सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील शेतकरी कमलाकर विनायक आवटे यांच्या घराशेजारी आज दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत सुमारे ३हजार ५०० कडब्याच्या पेंढ्या आणि शेतीचे महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत अंदाजे १ लाख ५० हजार ते
म्हाळसापूर येथील आगीत कडबा आणि शेतीचे साहित्य जळून खाक :शेतक-याचे लाखोंचे नुकसान


परभणी, 19 मे (हिं.स.) सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील शेतकरी कमलाकर विनायक आवटे यांच्या घराशेजारी आज दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत सुमारे ३हजार ५०० कडब्याच्या पेंढ्या आणि शेतीचे महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत अंदाजे १ लाख ५० हजार ते २ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार १९ मे २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास कमलाकर आवटे यांच्या घराशेजारील आवारात अचानक आग लागली. या आवारात सुमारे ३ हजार ५०० कडब्याच्या पेंढ्या रचून ठेवण्यात आल्या होत्या. तसेच शेतीसाठी लागणारे साहित्य जसे की ४० पाईप आणि इतर अवजारे देखील तेथेच ठेवलेली होती.उन्हाचा कडाका आणि वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.ग्रामस्थांनी आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत सर्व कडबा आणि शेतीची अवजारे जळून खाक झाली होती. आग नेमकी कशामुळे लागली,याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील पांडुरंग सोळंके आणि महसूल अधिकारी स्वाती राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली.

गावातील नागरिक उत्तम जनार्धन आवटे, बाळासाहेब बळिराम आवटे, मदन साहेबराव आवटे, विठ्ठल ज्ञानोबा आवटे आणि सुंदर देविदास सोळंके यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करण्यात आला आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी,अशी मागणी म्हाळसापूर येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande