
अमरावती, 19 मे (हिं.स.) : तालुक्यातील चुरणी केंद्रावर आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात आलेल्या मका खरेदीचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने 20 ते 25 शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मका खरेदी होऊन बराच कालावधी उलटून गेला असतानाही संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नसल्याने खरिपाच्या कामांवर परिणाम होत आहे.
शेतकरी बांधवांनी मोठ्या मेहनतीने मका पिकवून शासनाच्या नियमानुसार चुरणी केंद्रावर विक्री केली होती. मात्र विक्री झाल्यानंतरही पैसे रखडल्याने अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतीची पुढील कामे, कर्जाचे हप्ते, घरखर्च तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची अत्यंत गरज असताना पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
चुरणी केंद्रावरील अनेक शेतकरी आजही आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रतीक्षा करत आहेत. वारंवार चौकशी करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
“आम्ही शासनाच्या विश्वासावर मका विक्री केली, मात्र आता स्वतःच्या पैशांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन चुरणी केंद्रावरील सर्व शेतकऱ्यांचे प्रलंबित मक्क्याचे पैसे तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करावेत, तसेच प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी