
परभणी, 19 मे, (हिं.स.)। अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांसाठी विनामूल्य “ड्रोन पायलट प्रशिक्षण” राबविण्यात येणार असून, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन पायलट परवानाही मिळणार आहे. इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.
“अमृत ड्रोन मिशन” अंतर्गत हा १० दिवसांचा निवासी प्रशिक्षण कोर्स पूर्णपणे मोफत राबविण्यात येत आहे. राज्यातील आठ प्रशिक्षण केंद्रांवर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था तसेच खर्च अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.ड्रोन तंत्रज्ञानामुळे युवकांसाठी अत्याधुनिक क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, सरकारी प्रकल्पांचे निरीक्षण अशा विविध क्षेत्रांत ड्रोनचा प्रभावी वापर वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन अमृत संस्थेने ही मोहीम सुरू केली आहे.दुर्बल घटकातील युवकांना ग्रामीण क्षेत्रात स्वंयरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे .या प्रशिक्षणामध्ये शेती क्षेत्रातील वापर, जमिनीचे सर्वेक्षण, एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा समावेश असून उमेदवारांना त्यानुसार प्रशिक्षण विषय निवडता येणार आहे. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचलनालय यांच्या सुरक्षित उड्डाण नियमावलीसह आधुनिक ड्रोन हाताळणी, ड्रोन देखभाल व तांत्रिक बाबींचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना स्वतःचा ड्रोन खरेदी करून व्यवसाय सुरू करायचा असल्यास अमृत संस्थेच्या कर्ज व्याज परतावा योजनेचाही लाभ घेता येणार आहे.महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविते. त्यामधे ब्राम्हण , कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बाणिया, बंत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार अशा जातीमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात .अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, बीएसएनएल कार्यालयाजवळ, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis