अमरावतीत रस्त्यावर पडलेल्या वृद्धाला आधार केंद्राकडून नवजीवन
अमरावती, 19 मे (हिं.स.) : शहरात वाढते तापमान आणि कडक उन्हाच्या तडाख्यात प्रभात टॉकीजजवळ सोमवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. सुमारे 46 अंश सेल्सिअस उष्णतेत एक निराधार वृद्ध रस्त्याच्या कडेला असहाय अवस्थेत पडलेले आढळले. अंगावर
“46 अंशांच्या उन्हात रस्त्यावर तडफडणाऱ्या आजोबांना मिळाला माणुसकीचा आधार”


अमरावती, 19 मे (हिं.स.) : शहरात वाढते तापमान आणि कडक उन्हाच्या तडाख्यात प्रभात टॉकीजजवळ सोमवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. सुमारे 46 अंश सेल्सिअस उष्णतेत एक निराधार वृद्ध रस्त्याच्या कडेला असहाय अवस्थेत पडलेले आढळले.

अंगावर फाटके कपडे, शरीरावर धूळ-मळाचा थर आणि अशक्त अवस्थेमुळे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर दिसत होती. हे दृश्य पाहून परिसरातील एका संवेदनशील व्यावसायिकाने तत्काळ अमरावती महानगरपालिकेच्या “एक हात मदतीचा” उपक्रमांतर्गत कार्यरत आधार केंद्राशी संपर्क साधला.

माहिती मिळताच आधार केंद्राची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्या वृद्धाला सुरक्षितपणे उचलून केंद्रात आणण्यात आले. केंद्रात आणल्यानंतर त्यांची अवस्था अधिकच दयनीय असल्याचे दिसून आले. दीर्घकाळ स्वच्छतेचा अभाव असल्याने शरीरावर मोठ्या प्रमाणात मळाचा थर जमा झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

यानंतर आधार केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापक ज्योती राठोड आणि काळजीवाहक रोहित घोंगडे यांनी स्वतः पुढाकार घेत त्या वृद्धाची स्वच्छ आंघोळ घातली, स्वच्छ कपडे दिले आणि जेवणही दिले.

काही तासांपूर्वी मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेले तेच वृद्ध आता सुरक्षित, स्वच्छ आणि शांत अवस्थेत दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले होते, तर उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

अमरावती महापालिका आणि पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला “एक हात मदतीचा” हा उपक्रम निराधारांसाठी आधार ठरत असून, अशा व्यक्तींना निवारा, अन्न आणि उपचार उपलब्ध करून देत आहे.

या घटनेतून कठोर उन्हाळ्यातही माणुसकी जिवंत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande