मेळघाटातील नागरिकांना आली राणांची आठवण
अमरावती, 19 मे (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे. धारणी तालुक्यातील हतरू गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी विविध समस्यांच्या निराकरणासाठी सोमवारी जिल्हाधिक
“जर आज नवनीत राणा खासदार असत्या तर…”; मेळघाटवासीयांचा प्रशासनावर संताप, जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर ठिय्या आंदोलन


अमरावती, 19 मे (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे. धारणी तालुक्यातील हतरू गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी विविध समस्यांच्या निराकरणासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र दिवसभर प्रतीक्षा करूनही कोणताही ठोस निर्णय किंवा समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांचा संताप व्यक्त झाला.

यावेळी आंदोलक महिलांना माजी खासदार नवनीत राणांची आठवण आली. राणा असत्या तर ही समस्या सुटली असती असे विधान त्यांनी केले.

गावातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवा, वीजपुरवठा तसेच शासकीय योजनांचा लाभ न मिळणे या प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी काही महिलांनी माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव घेत नाराजी व्यक्त केली. “आज नवनीत राणा खासदार असत्या तर आम्हाला इतका त्रास सहन करावा लागला नसता,” अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली. या वक्तव्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले.

मेळघाट हा आदिवासी आणि दुर्गम भाग म्हणून ओळखला जात असून, येथे पाणी, आरोग्य, रस्ते आणि प्रशासनाच्या सेवांबाबत सातत्याने प्रश्न निर्माण होत असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

दिवसभर प्रतीक्षा करूनही कोणताही ठोस निर्णय न मिळाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला असून, लवकरात लवकर मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande