
नांदेड, 19 मे (हिं.स.)। मुखेड-कंधार मतदारसंघाच्या विकासासाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणारा आहे. 2015 च्या पोटनिवडणुकीत आपण मला आशीर्वाद दिला आणि पहिल्यांदा विधानसभेवर पाठवले. तेव्हापासून या भागातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि येथील हातांना काम देण्यासाठी 'एमआयडीसी' (MIDC) व्हावी, ही प्रमुख मागणी होती.
मुखेड-कंधार मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. डोंगराळ भाग, हलक्या प्रतीची जमीन आणि पावसाची अनिश्चितता यामुळे आपला बळीराजा नेहमीच अडचणीत असतो. सिंचनाच्या मर्यादांमुळे शेतीतून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही आणि शेतीला जोडधंदा म्हणून परिसरात एकही मोठा उद्योग नव्हता. यामुळेच आपला तरुण रोजगारासाठी पुणे, मुंबई किंवा हैदराबादकडे धाव घेत होता.
या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 'स्वतंत्र एमआयडीसी' (MIDC) व्हावी यासाठी पहिल्या दिवसापासून कंबर कसली होती:विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात आपल्या हक्काच्या एमआयडीसीसाठी आग्रही मागणी लावून धरली.राज्य शासन, उद्योग विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात शेकडो वेळा चकरा मारून तांत्रिक अडचणी दूर केल्या.आपल्या भागातील जमिनीची वस्तुस्थिती मांडून 'अवर्षणग्रस्त' भागासाठी विशेष उद्योगांची मागणी केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांची वेळोवेळी भेट घेऊन आपल्या भागातील जनतेची व्यथा मांडली.मुखेड-कंधारसाठी एमआयडीसी मंजूर झाली आहे! हा विजय माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कष्टकरी शेतकरी आणि आशादायी तरुणाचा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis