
जळगाव, 19 मे, (हिं.स.) - उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी वातावरणात गारवा जाणवत असला, तरी सध्या या भागात मोठ्या किंवा व्यापक पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिली आहे.
अरबी समुद्रात वाढलेली आर्द्रता आणि दक्षिण-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबई, कोकण तसेच केरळ किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होत आहे. या हवामान बदलाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातही दिसून येत असून, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या ही हवामान प्रणाली मुख्यतः किनारपट्टी भागापुरती सक्रिय असल्याने उत्तर महाराष्ट्रात सलग किंवा मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या सरी पडू शकतात किंवा विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर