
जळगाव, 19 मे (हिं.स.) महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 संदर्भात निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने १८ मे २०२६ रोजी निवडणुकीची घोषणा केली असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार २५ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २ जून असून ३ जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ६ जून ठेवण्यात आली आहे. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे जिल्हाधिकारी, जळगांव यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे उपरोक्त दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील.या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण ७ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार असून मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करता येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडावी यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच मतदान व मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात येणार आहे
जळगाव महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीतील निवडून आलेले सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ जळगांव शहर महानगरपालिका, १५ नगर परिषदा व ०४ नगर पंचायतीचे निर्वाचीत व स्विकृत असे एकूण सदस्याची संख्या ६३० आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना मोरे हे असणार आहेत. सदर निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांचेकडून स्वतंत्र निवडणूक निरिक्षक यांची नियुक्ती केली जाणार आहे. सदर निवडणूकीसाठी खुल्या प्रवर्गासाठी अनामत रक्कम रु. १०,०००/- इतकी राहणार असून अनूसूचित जाती/जमाती करिता अनामत रक्कम रु. ५००० इतकी असेल.जळगांव स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२६ करिता मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार मतदान प्रक्रियेकरिता आवश्यक जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जळगांव स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२६ करिता मतमोजणीचे ठिकाण व सुरक्षा कक्ष जिल्हास्तरावर प्रस्तावित आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर