जेजुरीतील खंडोबा देवाच्या भंडाऱ्याबाबत प्रशासनाचा सकारात्मक निर्णय
भेसळयुक्त भंडाऱ्यावर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी पुणे, 19 मे (हिं.स.) : येथे लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या लेण्यात वापरल्या जाणाऱ्या भंडाऱ्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे जेजुरीकरांकडून स्वाग
Jejuri Khandoba


भेसळयुक्त भंडाऱ्यावर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

पुणे, 19 मे (हिं.स.) : येथे लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या लेण्यात वापरल्या जाणाऱ्या भंडाऱ्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे जेजुरीकरांकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त भंडारा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गेल्या काही काळात केमिकलयुक्त भंडाऱ्यामुळे भाविकांच्या कपाळावर जळजळ होणे, काळे चट्टे पडणे, डोळे आणि त्वचेची जळजळ होणे तसेच भंडारा ग्रहण केल्यानंतर त्रास होण्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे भाविकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती.

पाच महिन्यांपूर्वी जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवार खंडोबा देवाच्या दर्शनासाठी गडाच्या पायथ्याशी गेले असता भंडाऱ्याचा भडका उडून २० हून अधिक नागरिक भाजल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे जेजुरीत संतापाची लाट उसळली होती.

यानंतर श्री खंडोबा पालखी सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळ, नगरपरिषद आणि विविध संघटनांनी अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते.

दरम्यान, भंडाऱ्याबाबत योग्य धोरण निश्चित करण्यासाठी मंत्री नरहरी जिरवळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असून, सुरक्षित आणि शुद्ध भंडाऱ्याच्या वापराबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande