पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर रस्त्यावर; धरण प्रकल्पांविरोधात दोन हजारांचा एल्गार
रायगड, 19 मे, (हिं.स.) : कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टॉरेन्ट, पोशीर आणि शिलार धरण प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमी, शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. कर्जत या एकदिवस
andolan


रायगड, 19 मे, (हिं.स.) : कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टॉरेन्ट, पोशीर आणि शिलार धरण प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमी, शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

कर्जत या एकदिवसीय धरणे आंदोलनात सुमारे दोन हजार आंदोलकांनी सहभाग घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात टॉरेन्ट कंपनीच्या प्रकल्पांमुळे होणारा पर्यावरणीय ऱ्हास, जंगलांची तोड, आदिवासी व शेतकरी कुटुंबांचे विस्थापन तसेच जलस्रोतांवरील परिणाम याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “कर्जत तालुका संघर्ष समिती”च्या माध्यमातून हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

आंदोलकांनी सांगितले की, प्रस्तावित धरण प्रकल्पांमुळे हजारो एकर वनक्षेत्र बाधित होणार असून अनेक गावांवर विस्थापनाचे संकट ओढवणार आहे. या भागातील जैवविविधता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शविला आहे.

आंदोलनस्थळी तहसीलदार डॉ. नयन जाधव यांनी भेट देत आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी आंदोलकांनी शासनाने तातडीने प्रकल्प स्थगित करून स्थानिकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तसेच आदिवासी जमिनींवरील अन्याय, ग्रामपंचायतींवरील दबाव आणि जबरदस्तीने प्रकल्प राबवण्याच्या प्रयत्नांविरोधातही संताप व्यक्त करण्यात आला.

“ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा” अशा घोषणांसह आंदोलकांनी टॉरेन्ट कंपनीवर जोरदार टीका केली. भविष्यात प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे मूल्य कमी होईल आणि पर्यावरणाचा समतोल बिघडेल, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, आंदोलन शांततेत पार पडले असून पुढील काळात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande