परभणी - बाजार समित्यांना भेसळयुक्त शेतमालाविरोधात पणन संचालकांद्वारे कारवाईचे निर्देश
परभणी, 19 मे, (हिं.स.) बाजार क्षेत्रात फळे, भाजीपाला व अन्नधान्यामध्ये घातक रसायनांचा वापर, कृत्रिम रंग आणि भेसळ रोखण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार व थेट पणन परवाना धारकांनी कडक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्य शासनाने दिले आह
परभणी - बाजार समित्यांना भेसळयुक्त शेतमालाविरोधात पणन संचालकांद्वारे कारवाईचे निर्देश


परभणी, 19 मे, (हिं.स.) बाजार क्षेत्रात फळे, भाजीपाला व अन्नधान्यामध्ये घातक रसायनांचा वापर, कृत्रिम रंग आणि भेसळ रोखण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार व थेट पणन परवाना धारकांनी कडक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. परवानाधारक व्यापाऱ्यांची नियमित तपासणी करून दोषींवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत कारवाई करण्याबाबत पणन संचालक शरद जरे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत बाजार क्षेत्रातील शेतमाल खरेदी-विक्रीचे नियमन करण्यात येते. शेतकऱ्यांचा माल योग्य दरात विकला जावा, ग्राहकांची फसवणूक टाळली जावी तसेच दर्जेदार उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी नियंत्रित बाजार क्षेत्रांची स्थापना करण्यात आली आहे.राज्य शासनाने जारी केलेल्या सूचनांनुसार फळे कृत्रिमरित्या पिकविणे, गोडी वाढविण्यासाठी रसायनांचा वापर करणे, फळे-भाजीपाला व अन्नधान्य कृत्रिम रंगांनी रंगविणे तसेच आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणे या प्रकारांवर लक्ष ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांवर नियमित देखरेख ठेवून आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच भाजीपाला, फळे व फुले यांच्या विक्री, वाहतूक व साठवणुकीसाठी कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यास प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. अन्नधान्य किंवा शेतीमालामध्ये भेसळ अथवा घातक रसायनांचा वापर झाल्याचा संशय आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधून संबंधित दोषींविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भेसळ करणाऱ्या परवानाधारक व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून त्यांना दिलेल्या सुविधा काढून घेण्याची कार्यवाहीही करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande