साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांडाविरोधात मूकमोर्चा
आरोपींना फाशीची मागणी; परिसरात संतापाची लाट धुळे, 19 मे (हिं.स.) : साक्री तालुक्यातील दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी मूकमोर्चा काढून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. वर्धाने शिवा
साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांडाविरोधात मूकमोर्चा


आरोपींना फाशीची मागणी; परिसरात संतापाची लाट

धुळे, 19 मे (हिं.स.) : साक्री तालुक्यातील दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी मूकमोर्चा काढून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

वर्धाने शिवार आणि उभरांडी शिवारात घडलेल्या या घटनेत अक्षय सोनवणे आणि जयश्री काकुस्ते या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाडणे गावासह परिसरातील ग्रामस्थांनी भाडणे ते साक्री तहसील कार्यालय असा मूकमोर्चा काढत “भोंदू बाबा योगेश खैरनारला फाशी द्या” आणि “पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणा दिल्या.

मोर्चानंतर ग्रामस्थांनी नायब तहसीलदार किरण कोठावदे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना निवेदन सादर केले. आरोपी योगेश खैरनार याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे, तसेच दोषींना तातडीने अटक करून निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी करण्यात आली.

या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande