नीट पेपरफुट : पुण्यात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन
पुणे, 19 मे (हिं.स.) : नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी पुण्यात विविध विद्यार्थी संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI), स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) तसेच अन्य विद्यार्थ्यांनी गुडलक चौक परिसरात
neet


पुणे, 19 मे (हिं.स.) : नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी पुण्यात विविध विद्यार्थी संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI), स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) तसेच अन्य विद्यार्थ्यांनी गुडलक चौक परिसरात एकत्र येत केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘मुरमुरे बेचो’ आंदोलन करत निषेध नोंदवला. ‘नीटची तयारी सोडा, मुरमुरे विका’ असे फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी एनटीएवर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सौदा केल्याचा आरोप केला. आंदोलनादरम्यान ‘एनटीए बरखास्त करा’, ‘चिट्ठे चोर’ आणि ‘डॉक्टरची डिग्री विक्रीसाठी नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मॉडर्न कॉलेज आणि डेक्कन परिसरातही आंदोलकांनी निदर्शने करत पेपरफुटीप्रकरणी संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारामुळे देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले असून मानसिक तणावातही मोठी वाढ झाली आहे.

पेपरफुटीप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande