
नांदेड, 19 मे (हिं.स.) : महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका च्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जुन्या नांदेड भागातील प्रमुख बाजारपेठांमध्ये धडक मोहीम राबवत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटवली. इतवारा परिसरातील चिकन मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मार्केट तसेच ऐतिहासिक बर्की चौक परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.
जुन्या नांदेडमधील इतवारा आणि बर्की चौक हा शहरातील अत्यंत गजबजलेला व्यापारी परिसर मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरच दुकाने थाटणे, अनधिकृत शेड उभारणे आणि हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. यामुळे पादचारी आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कडक पोलीस बंदोबस्तात थेट कारवाई सुरू केली. चिकन आणि मच्छी मार्केटमधील अनधिकृत ओटे, शेड आणि जाळ्या जप्त करण्यात आल्या. भाजी मार्केट परिसरातील रस्त्याची जागा अडवून बसलेल्या विक्रेत्यांचे साहित्य हटवण्यात आले. तसेच बर्की चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारे हातगाडे, फ्लेक्स आणि तात्पुरती अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवून साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपआयुक्त अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात अतिक्रमण विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मोहीम राबवली.
कारवाईदरम्यान इतवारा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती, पोलीस उपनिरीक्षक आवटे तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे आणि त्यांच्या पथकाचे सहकार्य लाभले. अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, पथक प्रमुख विशाल सोनकांबळे यांच्यासह महापालिकेचे ३० कर्मचारी आणि पोलीस विभागातील २० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
महापालिका प्रशासनाने संबंधित विक्रेते आणि दुकानदारांना कडक इशारा देत पुन्हा अतिक्रमण केल्यास साहित्य जप्त करून थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे इतवारा आणि बर्की चौक परिसरातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis