
कोल्हापूर, 19 मे (हिं.स.)। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेला आहे. शेती नसेल तर शेतकऱ्याची अवस्था बिकट होईल. या निर्णायक लढाईत शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या गरज नसलेल्या शक्तीपीठ विरोधात येत्या ९ जूनला भव्य मोर्चा दसरा चौकातून निघेल असे आ सतेज पाटील यांनी जाहीर केले.
कसबा बावडा.( कोल्हापूर) येथे गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वपक्षीय मेळावा माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगाववर, माजी आमदार संपतबापू पवार आ सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कसबा बावडा येथे पार पडला.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरीक या महामार्गाला कडाडून विरोध करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात आ. सतेज पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यात वारणा नदीवर ऐतवडे जि. सांगली ते बहिरेवाडी हा ६ ते ७ किलोमीटरचा कमीत कमी २० फूटापासून ५० फूटापर्यंत भराव पडणार आहे. त्याचबरोबर केर्ली ता. पन्हाळा ते शिरोली दुमाला ता. करवीर याठिकाणी १७ किलोमीटर अंतरावर २० फुटापासून ते ७० फुटाचा भराव पडणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा , कासारी , पंचगंगा, भोगावती , तुळशी नदी ,कुंभी नदी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन महापुराची परिस्थिती निर्माण होणार आहे. यामुळे ६० ते७० गावांमधील जनतेला याचा फटका बसणार आहे.
सह्याद्री घाटमाथ्यावरून पावसाळ्यात नद्यांमध्ये येणारे पाण्याचा प्रवाह हा ताशी ५० किलोमीटर वेगाने असणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या भरावास हे पाणी तटल्याने पाण्याला फुग निर्माण होवून मोठ्या प्रमाणात बागायती जमीनीचे नुकसान होणार आहे
कोल्हापूर जिल्हा हा साखर उद्योगाचा जिल्हा म्हणून संपुर्ण देशात परिचित आहे. या महामार्गासाठी पिकाऊ जमीन संपादित होणार आहे. त्याबरोबरच पाण्याचा निचरा जास्त दिवस झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊसाच्या उत्पन्नात घट होणार आहे. यामुळे साखर कारखानदारी संकटात येणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाचा एका किलोमीटरचा खर्च हा जवळपास ११७ कोटी रूपये असणार आहे. या प्रकल्पातून देवेंद्र फडणवीस यांना ५० ते ६० हजार कोटींचा ढपला पाडायचा आहे.
या महामार्गात सर्वाधिक पिकाऊ जमीन संपादित होणार आहे .शक्तीपीठ महामार्गाला १३ जिल्ह्यातून कडाडून विरोध होवू लागले आहेत. लोक रस्त्यावर उतरून आया बहिणींना घेऊन विरोध करू लागले आहेत.
या मेळाव्याला माजी आ. के पी पाटील, माजी आ. राजू आवळे, राजीव आवळे, गिरीश फोंडे, विजय देवणे, कॅा. अतुल दिघे, कॅा. उदय नारकर, चेतन नरके, राहूल देसाई, मनोज फराकटे, प्रकाश पाटील, धैर्यशील पाटील कौलवकर, ए वाय पाटील, शिवाजी मगदूम, विक्रांत पाटील, वैभव कांबळे, रविकिरण इंगवले, सुनिल शिंत्रे शिवाजीराव मगदूम. सम्राट मोरे, कॉ. संपत देसाई यांच्यासह कोल्हापूर जिल्हाभऱातील अनेक शेतकरी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar