
अमरावती, 19 मे (हिं.स.) : गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर अमरावतीच्या स्थानिक राजकारणात भाजप-एनडीएतील ‘पटेल लॉबी’ आणि राणा दाम्पत्य यांच्यातील मतभेदांची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
स्थानिक राजकीय घडामोडींनुसार, भाजप आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यातील गट विरुद्ध दुसरीकडे ‘पटेल लॉबी’शी संबंधित मानले जाणारे नेते असा स्पष्ट राजकीय तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
चर्चेनुसार, आमदार रवी राणा हे भाजप नेते व माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या विरोधात राजकीय रणनीती आखत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच वेळी भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके तसेच शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू हे राणा दाम्पत्याविरोधात एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या गटबांधणीत अनेक नेते ‘पटेल लॉबी’शी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच विविध पक्षांतील काही नेते देखील प्रवीण पोटे यांना विधान परिषदेवर पाठविण्यास इच्छुक असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
यामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलताना दिसत असून, राणा दाम्पत्य काहीसे एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाल्याची चर्चा आहे.
आगामी विधान परिषद निवडणुकीत हा अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी