
पुणे, 19 मे, (हिं.स.)। शहरात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने सार्वजनिक ठिकाणे आणि कचरा हस्तांतरण केंद्रांवर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मुद्द्यावरून महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला. यावेळी कचरा नैसर्गिकरीत्या साचलेला नसून तो जाणीवपूर्वक साठवला जात असल्याचा गंभीर आरोपही सभागृहात करण्यात आला.
नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी कचरा समस्येचा मुद्दा उपस्थित करताना, वारंवार तक्रारी करूनही त्यांच्या प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याचे सांगितले. नगरसेविका वासंती जाधव यांनीही कोथरूड परिसरात गेल्या आठ दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याचा आरोप केला. अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी कचरा संकलन केंद्रांवर पाच ते सहा दिवस कचरा साचून राहत असल्याकडे लक्ष वेधले. “कचरा वाहून नेण्यासाठी गाड्या कमी आहेत की प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेवक अरविंद शिंदे यांनी कचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करत, “५०० टन क्षमतेच्या कचरा प्रकल्पाची निविदा विशिष्ट ठेकेदाराला मिळावी यासाठी जाणीवपूर्वक परिस्थिती निर्माण केली जात आहे. या प्रक्रियेत ७०० कोटी रुपयांचा घोटाळा असून कचरा माफिया शहरातील कचरा उचलत नाहीत,” असा आरोप केला.प्रशांत जगताप यांनी उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पासाठी महापालिकेकडे आवश्यक परवानग्या आहेत का, असा सवाल उपस्थित केला. “राज्यात सर्वाधिक टिपिंग शुल्क देऊनही शहर स्वच्छ राहत नाही. काही लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांच्या निविदांना लाभ मिळावा यासाठी हा प्रकार सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु