
पाळीव प्राणी आणि मालक एकत्र धावणार
नाशिक, 19 मे (हिं.स.)। शहरात प्रथमच “नाशिक पेटाथॉन २०२६” या अनोख्या पेट मॅरेथॉनचे ०७ जून रोजी आयोजन करण्यात आले आहेत. माणूस आणि पाळीव प्राणी एकत्र धावण्याचा अनुभव नागरिकांना मिळणार आहे. हा उपक्रम फ्रावशी ग्रुप ऑफ स्कूल्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.
फिटनेस, लाइफस्टाइल, मनोरंजन आणि मानव-प्राणी नात्याचा उत्सव म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.या उपक्रमाच्या अधिकृत लॉन्च कार्यक्रमाला नाशिकमधील मीडिया, फिटनेस, क्रीडा, लाइफस्टाइल आणि पेट कम्युनिटीतील मान्यवर उपस्थित होते. नागरिक, प्राणीप्रेमी, कुटुंबीय आणि विविध ब्रँड्सना एकत्र आणणारा हा शहरातील पहिलाच मोठा पेट-कम्युनिटी कार्यक्रम ठरणार आहे.
पेटाथॉनमध्ये पाळीव प्राण्यांसाठी विशेष १ किमी “पेट रन” आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांसाठी ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अशा विविध मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा प्रोफेशनल टाइमिंग सिस्टीमसह पार पडणार आहेत.
विविध आकर्षणांनी सजलेला उत्सव
कार्यक्रमात पाळीव प्राण्यांसाठी विशेष डॉग प्ले एरिना उभारण्यात येणार असून, त्यात टनेल्स, मिनी हर्डल्स, रॅम्प्स, बॉल पिट्स, स्प्लॅश पूल आणि अॅजिलिटी गेम्सचा समावेश असेल. तसेच नागरिकांसाठी पिकल बॉल, कॅलिस्थेनिक्स, , रिदमिक जिम्नॅस्टिक्स आणि ग्रुप फिटनेस सेशन्स यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पेट, फिटनेस, फॅशन आणि वेलनेस क्षेत्रातील विविध ब्रँड्सचे स्टॉल्सही कार्यक्रमात असतील. सहभागींना एक हजार रुपयांहून अधिक किमतीच्या वस्तूंचा समावेश असलेले प्रीमियम पार्टिसिपेशन किट आणि गिव्हअवे दिले जाणार आहेत.
यावेळी रतन लथ, शर्वरी लथ, प्रथमेश पाटकर, डॉ पोपट काळे, सचिन वेंदे पशु वैद्यकीय अधिकारी, डॉ रणजित जोशी, डॉ चेतना दहिवेलकर, डॉ आश्लेषा पवार आदी उपस्थित होते.
येथे करा नोंदणी
मॅरेथॉनचा मार्ग नाशिकमधील प्रमुख रस्त्यांवरून असणार असून, सहभागी आणि पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरण तयार करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी www.nashikpethathon.in ला भेट देता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV