
एफडीएकडून केवळ सात नमुन्यांची तपासणी; अहवालासाठी महिनाभर प्रतीक्षा
पुणे, 19 मे (हिं.स.) : उन्हाळ्याच्या दिवसांत रंगीबेरंगी बर्फगोळे, शीतपेये, कुल्फी आणि आईसक्रीम नागरिकांना आकर्षित करत असले, तरी त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कडून उन्हाळा सुरू झाल्यापासून विविध विक्रेत्यांकडून केवळ सात नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांच्या अहवालासाठी तब्बल महिनाभर लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर शरीराला थंडावा देणाऱ्या बर्फगोळे, लिंबू सरबत, रसवंतीगृहातील पेये आणि अन्य थंड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, अस्वच्छ पाण्यापासून तयार होणारा बर्फ, निकृष्ट दर्जाचे कृत्रिम रंग आणि अस्वच्छ पद्धतीने होणारी निर्मिती यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा बर्फाचे सेवन केल्यास पोटाचे विकार, उलट्या-जुलाब, संसर्गजन्य आजार तसेच इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फ आणि औद्योगिक वापरासाठी असलेल्या अखाद्य बर्फामध्ये स्पष्ट फरक असून, औद्योगिक वापरासाठीचा अखाद्य बर्फ निळ्या रंगाचा असावा, असे निर्देश एफडीएकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, शहरातील अनेक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करून अयोग्य प्रकारचा बर्फ वापरला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एफडीएकडून तपासणी मोहीम सुरू असली तरी नमुन्यांचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याने तोपर्यंत अशा प्रकारची विक्री सुरू राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत सह आयुक्त दिगंबर भोगावडे यांनी सांगितले की, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे ‘उन्हाळी मोहीम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे बर्फाचे नमुने संकलित केले जात असून, निकृष्ट दर्जाचा बर्फ आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे
-------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु