पुणे विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
डीटीएलची प्रश्नपत्रिका खासगी पुस्तकातून ‘कॉपी-पेस्ट’ केल्याचा आरोप पुणे, 19 मे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’ (डीटीएल) अभ्यासक्रमाच्या ‘लेखांकन व हिशोबशास्त
University Pune SPUU


डीटीएलची प्रश्नपत्रिका खासगी पुस्तकातून ‘कॉपी-पेस्ट’ केल्याचा आरोप

पुणे, 19 मे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’ (डीटीएल) अभ्यासक्रमाच्या ‘लेखांकन व हिशोबशास्त्र’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर प्रकार उघडकीस आला असून, संपूर्ण प्रश्नपत्रिका एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसाच्या तसा ‘कॉपी-पेस्ट’ करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

विद्यापीठातर्फे नुकतीच या विषयाची परीक्षा घेण्यात आली. २०२५ च्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार प्रथमच १०० गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. मात्र, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेची तुलना संबंधित विषयाच्या खासगी मार्गदर्शक पुस्तकासोबत केली असता, प्रश्नपत्रिकेतील सर्व आठ प्रश्न हे ‘लॉयर्स कंपॅनियन ऑन लेखांकन व हिशोबशास्त्र फॉर डीटीएल’ या पुस्तकातून थेट उचलल्याचे निदर्शनास आले.

या घटनेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांनी स्वतंत्र अभ्यास, विश्लेषण किंवा दर्जेदार प्रश्ननिर्मिती न करता थेट पुस्तकातील प्रश्नांचा आधार घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, हेच प्रश्न २०२३ मध्ये डीईएस श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या अंतर्गत परीक्षेतदेखील विचारण्यात आले होते. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेवर तसेच गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकारामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून, संबंधित प्राध्यापक आणि परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे

---------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande