सोयाबीनला विक्रमी दर; मात्र शेतकरी लाभापासून वंचित
अमरावती, 19 मे (हिं.स.) : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल तब्बल ७,१४५ रुपयांचा दर मिळाल्याने गेल्या पाच वर्षांतील हा उच्चांकी दर ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, सोयाबीन तेलाची वाढती मागणी आणि देशांतर्गत कमी झालेली
सोयाबीनला विक्रमी दर; मात्र शेतकरी लाभापासून वंचित


अमरावती, 19 मे (हिं.स.) : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल तब्बल ७,१४५ रुपयांचा दर मिळाल्याने गेल्या पाच वर्षांतील हा उच्चांकी दर ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, सोयाबीन तेलाची वाढती मागणी आणि देशांतर्गत कमी झालेली आवक यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजार समितीत दररोज ८० ते १०० क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. मात्र या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला बाजारभाव ४,१०० ते ४,३०० रुपयांपर्यंत घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेतून कमी दरातच सोयाबीन विकून टाकले. केंद्र शासनाने ५,३२८ रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी नाफेड खरेदी केंद्र सुरू होण्यात झालेला विलंब, नोंदणीतील अडचणी आणि मर्यादित खरेदी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना हमीभावाचाही लाभ मिळू शकला नाही.

सध्या बाजारात सोयाबीनचा दर ७,३०० रुपयांपर्यंत पोहोचला असला तरी बहुतेक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी मालच शिल्लक नाही. त्यामुळे साठेबाज व्यापारी व सावकारच या तेजीचा फायदा घेत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दरम्यान, कापूस बाजारातही तेजी कायम असून कापसाला प्रतिक्विंटल ८,४०० ते ९,८५५ रुपये दर मिळत आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande