
नाशिक, 19 मे (हिं.स.) : नाशिकरोड प्रभाग सभापतींच्या कार्यालयात शिवसेना शिंदे गटाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ लावण्यात आल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला असून, चिन्ह तत्काळ काढले नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.
नाशिकरोड प्रभाग सभापतीपदाची सूत्रे शिवसेना शिंदे गटाचे रमेश धोंगडे यांनी सोमवारी (दि. 18) स्वीकारली. त्यानंतर त्यांच्या कार्यालयात धनुष्यबाण चिन्ह लावण्यात आल्याने उद्धवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग सभापती कार्यालय हे सर्व पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे असते, त्यामुळे तेथे कोणत्याही एका पक्षाचे चिन्ह लावणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक महापालिकेच्या सहा प्रभाग सभापतींची निवडणूक अलीकडेच बिनविरोध पार पडली होती. नाशिकरोड प्रभागाची जबाबदारी शिंदे गटाकडे गेल्यानंतर रमेश धोंगडे यांची निवड झाली. मात्र, कार्यालयात पक्षचिन्ह लावल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
उद्धवसेनेच्या मते, महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयात पक्षचिन्ह लावले जात नाही, ही परंपरा आहे. त्यामुळे या निर्णयावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना सभापती रमेश धोंगडे यांनी स्पष्टीकरण दिले की, कार्यालय काही वर्षांपासून बंद होते आणि तेथे उद्घाटनानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह लावण्यात आले होते. सभापती हे सर्व नगरसेवकांचे प्रतिनिधित्व करतात, असेही त्यांनी नमूद केले.
या घटनेमुळे नाशिकरोडमध्ये शिंदे गट आणि उद्धवसेनेमध्ये पुन्हा एकदा राजकीय तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV