
कोल्हापूर, 19 मे (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे जप्त किंवा बेवारस म्हणून पडून असलेल्या शेकडो वाहनांचा अखेर जाहीर लिलाव करून विक्री करण्यात आली. या लिलावातून पोलिस दलाला एकूण 10 लाख 22 हजार रुपयांचा महसूल मिळाला असून, पोलिस ठाण्यांच्या आवारात मोठी जागाही मोकळी होणार आहे.
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आलेल्या या वाहनांचा लिलाव पोलिस अधीक्षक निलोत्पल आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या प्रक्रियेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्षपद उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्याकडे होते. तसेच वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, परिवहन विभागाचे सुरजसिंग रजपूत आणि शिरोली एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांचा समितीत समावेश होता.
सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत झालेल्या या लिलावामध्ये एकूण 345 वाहने समाविष्ट होती. यात 338 दुचाकी, 6 चारचाकी आणि 1 तीनचाकी वाहनाचा समावेश होता. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि धुळे जिल्ह्यातून एकूण 82 लिलावधारकांनी सहभाग घेतला.
या लिलावासाठी प्रत्येक सहभागीला 2,000 रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते. अखेरीस शाहूपुरी, कोल्हापूर येथील ‘एस. एम. स्टील फर्म’ यांनी सर्वाधिक 10 लाख 22 हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावून ही सर्व बेवारस व जप्त वाहने खरेदी केली.
या लिलावामुळे एकीकडे पोलिस ठाण्यांतील जागेचा प्रश्न सुटणार असून दुसरीकडे पोलिस दलाच्या महसुलातही भर पडली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar