सोलापुरात ‘मोफत पाठ्यपुस्तक योजने’चा शुभारंभ; ७२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
सोलापूर, 19 मे (हिं.स.)। समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मोफत पाठ्यपुस्तक योजना २०२६-२७’चा सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती, पुणे यांच्या
sdfg


सोलापूर, 19 मे (हिं.स.)। समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मोफत पाठ्यपुस्तक योजना २०२६-२७’चा सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती, पुणे यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील पाठ्यपुस्तकांचा साठा सोलापूर मनपा मराठी केंद्र शाळा क्रमांक ६ येथे सुरक्षितपणे पोहोचला आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य लेखा अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर आणि प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या ७२ हजार ३६३ विद्यार्थ्यांची लाभार्थी म्हणून नोंद करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांसाठी एकूण ४ लाख ५० हजार ९८० पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सध्या ९५ हजार ते १ लाख पुस्तके प्राप्त झाली असून उर्वरित पुस्तकेही लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सोलापूर शहरातील मनपा व खाजगी अनुदानित अशा एकूण ३२६ शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शहरातील बहुभाषिक शैक्षणिक रचनेचा विचार करून मराठी, उर्दू, कन्नड, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी अशा सहा माध्यमांच्या शाळांमध्ये पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.

माध्यमनिहाय शाळांची संख्या पुढीलप्रमाणे आहे — मराठी माध्यमाच्या २१८, उर्दूच्या ५२, कन्नडच्या १४, तेलुगूच्या ३, हिंदीच्या २ आणि इंग्रजीच्या २ शाळांचा यात समावेश आहे.

“विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पुस्तके मिळावीत, यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. बालभारतीकडून पहिला साठा प्राप्त झाला असून त्याचे नियोजनबद्ध वितरण लवकरच सुरू होईल,” अशी माहिती प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande