
सोलापूर, 19 मे (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्यालयामागील स्टोअर विभागात सोमवारी घडलेल्या कथित भंगार चोरी प्रकरणामुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेले साहित्य आणि भंगार वाहनांमधून बाहेर नेले जात असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे नेते अमोल शिंदे यांनी थेट स्टोअर विभागात धडक देत प्रकार उघडकीस आणला.
महापालिकेच्या स्टोअर विभागात अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य व भंगार ठेवले जाते. सोमवारी सकाळी एका वाहनातून काही साहित्य बाहेर नेण्यात आले. त्यानंतर तेच वाहन पुन्हा स्टोअर परिसरात दाखल झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात भंगार आणि साहित्य वाहनात भरले जात असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी अमोल शिंदे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, अधिकारी अविनाश वाघमारे तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
अमोल शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमोरच तीव्र नाराजी व्यक्त करत, “महापालिकेच्या मालमत्तेची अशी खुलेआम लूट सुरू आहे का?” असा सवाल उपस्थित केला. त्यांनी स्टोअर विभागातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने तपासून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनीही प्रकार गंभीर असल्याचे मान्य करत संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड