महाराष्ट्रात 9.86 कोटी मतदारांची सखोल पडताळणी मोहीम
निवडणूक आयोगाची ‘एसआयआर’ प्रक्रिया; जूनपासून छत्रपती संभाजीनगर, 19 मे (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, यात महाराष्ट्रचा समावेश कर
महाराष्ट्रात 9.86 कोटी मतदारांची सखोल पडताळणी मोहीम


निवडणूक आयोगाची ‘एसआयआर’ प्रक्रिया; जूनपासून

छत्रपती संभाजीनगर, 19 मे (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, यात महाराष्ट्रचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

राज्यात ही मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवली जाणार असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहितीची पडताळणी करतील. या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले बूथ लेव्हल एजंट्स (BLA) सहकार्य करणार आहेत.

या मोहिमेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. 20 ते 29 जून 2026 दरम्यान बीएलओंचे प्रशिक्षण आणि पूर्वतयारी होणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेटी देऊन माहिती संकलन केले जाईल.

5 ऑगस्ट 2026 रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती नोंदवता येतील. अखेर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले एजंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेमुळे दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नवीन पात्र मतदारांची नोंदणी अधिक अचूक आणि पारदर्शक होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande