सोलापूर - दिपाली ताड एसटीने पंचायत समितीत दाखल
सोलापूर, 19 मे (हिं.स.)। अमेरिका-इस्राइल-इराण युद्धामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी जनता आणि लोकप्रतिनिधींना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवेढा पंचायत समितीच्य
सोलापूर - दिपाली ताड एसटीने पंचायत समितीत दाखल


सोलापूर, 19 मे (हिं.स.)। अमेरिका-इस्राइल-इराण युद्धामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी जनता आणि लोकप्रतिनिधींना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती दिपाली ताड यांनी आज पाटकळ ते मंगळवेढा हा प्रवास एसटी बसने करत पंचायत समिती कार्यालयात हजेरी लावली. पंतप्रधानांच्या आवाहनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या त्या मंगळवेढ्यातील पहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत.

गेल्या चार वर्षांपासून पंचायत समितीवर प्रशासक नियुक्त असल्याने प्रशासकीय कामकाजात मोठा विस्कळीतपणा निर्माण झाला होता. मात्र, चार महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी निवडून आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सभापती दिपाली ताड यांच्या दालनात नागरिक विविध प्रश्न घेऊन येत असून, त्या तत्परतेने समस्यांचे निराकरण करत असल्याने त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.

सध्या वाढती उन्हाची तीव्रता, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना, शिक्षण विभागातील रिक्त पदे, स्वच्छता व आरोग्यविषयक प्रश्न तसेच खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचे नियोजन या महत्त्वाच्या विषयांवर पंचायत समितीची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.या पार्श्वभूमीवर सभापती दिपाली ताड यांनी कार्यालयीन वेळेत चारचाकी वाहनाचा वापर टाळत एसटी बसने प्रवास करून इंधन बचतीचा संदेश दिला. त्यांच्या या प्रवासादरम्यान प्रवाशांनी ग्रामीण भागासाठी अधिक नवीन बसेस सुरू करण्याची मागणी केली. तसेच आगारातील अनेक बस वारंवार ग्रामीण मार्गावर बंद पडत असल्याच्या तक्रारीही त्यांनी सभापतींसमोर मांडल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande