
अमरावती, 19 मे (हिं.स.) ।काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजी, उमेदवार निवडीत हस्तक्षेप तसेच पक्ष संघटनेतील नियुक्त्यांमध्ये विश्वासात न घेतल्याचे सांगत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीपासूनच पक्षांतर्गत मतभेद सुरू झाल्याचा आरोप सुधाकर भारसाकडे यांनी केला आहे. आपल्या मर्जीतले तीन उमेदवार असतानाही त्यांना तिकीट देण्यात आले नाही. त्या वेळेपासूनच माझ्या मनात खदखद सुरू होती, असे त्यांनी स्पष्ट केले. नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत विविध बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. ठाकरे यांना उमेदवारी दिल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे पॅनल टू पॅनल मतदान चालवले. मात्र माझ्या गटातील उमेदवाराला जाणीवपूर्वक पराभूत करण्यासाठी माझा राजकीय गेम करण्यात आला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, पक्षात मुद्दाम गटबाजी निर्माण करून बाळासाहेब हिंगणीकर आणि माझ्यामध्ये दोन गट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे हिंगणीकर भाजपमध्ये गेल्यानंतरही काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान,अलीकडेच झालेल्या ओबीसी सेल, अल्पसंख्यांक सेल तसेच अनुसूचित जाती-जमाती सेलच्या नियुक्त्यांमध्ये तालुकाध्यक्ष असूनही कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने आपण अस्वस्थ झालो, असे त्यांनी म्हटले. या नियुक्त्या नितेश वानखेडे आणि बळवंत वानखडे यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला. आता काँग्रेसमध्ये माझ्यासाठी काम राहिले नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून मी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुधाकर भारसाकडे यांनी स्पष्ट केले. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी