
सोलापूर, 19 मे, (हिं.स.)। सोलापूर शहरातील जुळे सोलापुरातील रेणुका नगर परिसरात ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पाणी टँकरद्वारे विकत घेण्याची वेळ आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.रेणुका नगरमध्ये सुमारे सहाशे घरांची वसाहत असून, महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अत्यंत अनियमित असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरात आठ-आठ दिवसांनी कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पुरेशी पाणीसाठवणूकही करता येत नाही. परिणामी अनेक कुटुंबांवर खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.नागरिकांनी याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून केवळ औपचारिक उत्तरे मिळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेत पाण्यासारख्या मूलभूत समस्येमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिरगुर यांनी सांगितले की, “गेल्या चार महिन्यांपासून रेणुका नगरातील पाणी समस्या गंभीर बनली आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि झोन अधिकाऱ्यांपर्यंत हा प्रश्न अनेकदा पोहोचवला. मात्र, अद्याप कोणतेही ठोस उपाय करण्यात आलेले नाहीत. महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.”दरम्यान, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागातील पाणीपुरवठ्याकडे तातडीने लक्ष देऊन नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड